शिरूर लोकसभा मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रासलेल्या नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव, चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरूर या तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या 19,192 कोटींच्या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याबाबत शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रस्ते – परिवहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले आहे.
आता नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि पुणे – शिरूर या तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने या मार्गांवरील वाहतूक कोंडी सुटणार आहे.
पुणे – नगर महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शिरूरचे आमदार अशोक पवार व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रयत्न सुरू होते. आता त्यांना मोठं यश मिळालं असून नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि पुणे – शिरूर या तीनही महामार्गांवर एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधकामाच्या निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
कसा असणार या तिन्ही मार्गांवरील एलिव्हेटेड कॉरिडॉर..
पुणे – सातारा महामार्गावरील दुमजली पूल, हडपसर – यवत उन्नत मार्ग, पुणे शिरूर 56 किलोमीटरचा एलिव्हेटेड मार्ग, तळेगाव – शिक्रापूर – चाकण 54 किलोमीटरचा मार्ग आणि नाशिक फाटा – खेड (चांडोली) मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार झाला असून आता टेंडर प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

वाघोली ते शिरूर दरम्यानच्या सध्याच्या पुणे – अहमदनगर मार्गावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रामवाडी – वाघोली ते शिरूर दरम्यान 56 किलोमीटरच्या दुमजली पुलासह 18 पदरी महामार्ग तयार होणार आहे.
यात एकुण तीन मार्ग असतील यातील जमीनीवरील रस्ता 6 पदरी असणार आहे, त्यावर दुमजली पूल उभारला जाणार असून या पुलावरही प्रत्येकी 6-6 लेन असणार आहेत . त्यामुळे हा रास्ता एकुण 18 पदरी होणार आहे. यामुळे पुणे ते शिरुर आणि शिरुर ते अहमदनगर हे अंतर देखील आता अत्यंत कमी होणार आहे.
