महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी गुलाबी ई-रिक्षा योजना सुरू केली आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात पुढील सहा महिन्यांत पाच हजार रिक्षा वाटप करण्याचे उद्दिष्ट असून नोंदणी प्रक्रियेला पुणे जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे.
पहिला टप्प्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 3400 महिलांना ई-पिंक रिक्षा देण्यात येणार आहे. त्यापैकी पुण्यात 2800 महिलांना या रिक्षा देण्यात येणार आहेत.
या महिलांना किमान दहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांना पाच वर्षांसाठी रिक्षाची देखभाल आणि चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. महामेट्रोशी झालेल्या करारामुळे या महिलांना फीडर सेवेअंतर्गत ई-रिक्षा सेवा दिली जाईल आणि त्यांना रोजगारही मिळणार आहे. तसेच विमानतळ आणि पर्यटन स्थळांवरही पिंक ई-रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
किती मिळणार आर्थिक मदत..
या योजनेअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक वाहनासाठी ₹25000 अनुदान देते, तर राज्य सरकार ₹75,000 चे योगदान देते. लाभार्थी महिलांना 10% आगाऊ रक्कम म्हणजे फक्त 12,300 रुपये जमा करावे लागतात, उर्वरित 70% रक्कम बँकांकडून कमी व्याजदराच्या कर्जाद्वारे दिली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :-
1. वयाचा पुरावा (जन्म नोंद दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / एस.एस.सी बोर्ड प्रमाणपत्र)
2. आधार कार्ड प्रत
3. पॅन कार्ड प्रत
4. मतदान ओळखपत्र प्रत
5. रेशनकार्ड प्रत
6. बैंक खाते पासबुक प्रत
7. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
8. कोणत्याही बँकेचे कर्जाचा बोजा नसल्याचे अर्जदाराचे हमीपत्र
9. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ३ लक्ष पेक्षा जास्त नसल्याचे प्रमाणपत्र
10. पिंक ई-रिक्षा स्वतः चालविणार असल्याचे अर्जदाराचे हमीपत्र
इच्छुक महिलांनी पिंक ई – रिक्षासाठी आपापल्या जिल्ह्याच्या ‘जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी’ याच्या कार्यालयाला अर्ज करावा.
