किमान आधारभूत दराने धान्य खरेदीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ..

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान, रागी भरडधान्य खरेदी करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या जुन्नर प्रादेशिक कार्यालयाने दिली आहे.

शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने (डिस्ट्रेस सेल) धान्य विकावे लागू नये, याकरिता ही योजना राबविण्यात येते. राज्य शासनाने आदिवासी उपयोजना क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची मुख्य अभिकर्ता म्हणून नियुक्ती केलेली आहे.

या योजनेअंतर्गत राज्यात ‘वाजवी सरासरी गुणवत्ता’ (एफएक्यू) दर्जाचे धान व भरडधान्याची खरेदी करण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा हा शासनाचा हेतू आहे. हंगाम 2023-2024 मध्ये धान ‘अ’ चे प्रतिक्विंटल खरेदी दर 2 हजार 203 रुपये, धान साधारण – 2 हजार 183 रुपये, तर रागीचे खरेदी दर 3 हजार 846 रुपये लागू करण्यात आलेले आहे.

पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ़ व खेड तालुक्यातील डेहणे येथे महामंडळाची खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. येथे धान भरडधान्य खरेदीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नोंदणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खरेदी केंद्रावर शासनाच्या एनइएमएल पोर्टलवर शेतकरी नोंदणी सुरू आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे..

नोंदणीसाठी 7/12 व 8 अ चा उतारा,
चालू हंगामातील पिकपेराची नोंदणी ,
बँक पासबुक व आधार कार्डच्या छायांकित प्रतीची आवश्यकता आहे.

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खरेदी केंद्रावर कार्यालयात येवून नोंदणी करावी असे आवाहन महामंडळाच्या जुन्नर येथील प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक रा. भ पाटील यांनी केले आहे.

Leave a Comment