लोणावळ्याला जागतिक पर्यटनस्थळ विकासाच्या दृष्टिकोनातून टायगर आणि लायन्स पॉईंट येथे काचेचा स्काय वॉक आणि इतर सुविधा असणारा प्रकल्प साकारण्यात येत आहे. या स्काय वॉक प्रकल्पासाठी 333 कोटी 56 लाख रुपयांच्या प्रस्तावाला उच्चाधिकार समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
लोणावळा परिसरातील पर्यटकांची गर्दी, हवामान पाहता येथील महाराष्ट्र पर्यटन महामंडळातर्फे (एमटीडीसी) विकास आराखडा तयार करण्यात येत होता. त्यानुसार प्रसिद्ध असलेल्या टायगर आणि लायन्स पॉईंट येथे काचेचा स्काय वॉक तयार करण्यास मंजुरी नुकतीच देण्यात आली होती. त्यानुसार पालकमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन एमटीडीसीकडून आर्थिक क्षमता नसल्याने वन विभागाकडून जागा घेऊन पीएमआरडीएने आराखडा करून प्रकल्प साकारण्याबाबत सूचना केल्या होत्या.
त्यानुसार पीमआरडीएने प्रकल्पाचा आराखडा तयार केला. पीएमआरडीएने या पर्यटनस्थळ विकासाच्या दृष्टीने विकास आराखडा करून जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीला पाठविण्यात आला. उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या 333 कोटी 56 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे लोणावळ्याजवळ जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, लोणावळा शहरातील विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी रस्ते, उपाहारगृह, पाणी सुविधा, वाहनतळ, शौचालय, लहान मुलांसाठी साहसी खेळ खेळण्यासाठी गार्डन किंवा इतर सुविधादेखील विकास आराखड्यात प्रस्तावित असून, याबाबतही काम करण्यात येणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांनी दिली आहे.

* टायगर पॉईंटची प्रस्तावित कामे..
ग्लास स्काय वॉक 125 मीटर लांब – 6 मीटर रुंद
एक हजार व्यक्तींसाठी ॲम्फी थिएटर
प्रकाश व ध्वनी शो
लहान मुलांची खेळण्याची जागा
प्रवेशद्वार व तिकीट घर
रस्ता रुंदीकरण 45 मीटर
वाहनतळ – एकूण 1500 कार, दोन हजार स्कूटर
गझिबो – 20 चौरस मीटर एकूण 24

* साहसी खेळ..
झिप लाइन – 125 मीटर लांब
वॉल क्लाइंबिग
बंजी जम्पिंग
फेरिस व्हील
