अवकाळीमुळे हरभरा पिकांवर घाटेअळीचे संकट, कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला मोलाचा सल्ला..

गत आठवड्यातील अवकाळी पाऊस आणि त्यानंतरच्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादूर्भाव वाढला आहे. या अळीचा वेळीच बंदोबस्त झाला तरचं पीक पदरात पडणार आहे. शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करावी, यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडून रेणापूर तालुक्यातील खरोळा शिवारात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

वातावरणातील बदलामुळे घाटेअळीचा धोका आर्थिक नुकसानीच्या पातळीला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच कीटकनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे. घाटेअळीबरोबरच बुरशीजन्य व मर रोगाचाही प्रादूर्भाव वाढत आहे. मर रोगाच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या ट्रायकोडार्मा किंवा बायमिक्स या जैविक बुरशीनाशक योग्य प्रमाणात ओळीच्या बाजुने आळवणी घेतली तर कीड नियंत्रणात येणार असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी सांगितले.

यावेळी कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉ. अरुण गुट्टे, तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

घाटेअळीचा असा करा बंदोबस्त..

घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्यास, शेतकऱ्यांनी एक एकरसाठी 20 पक्षी थांबे लावणे गरजेचे आहे. पक्षी थांबे हे पिकापेक्षा जास्त उंच असणे आवश्यक आहे. दोन ते तीन कामगंध सापळेही लावल्यास फायद्याचे ठरणार आहे. अळीच्या नियंत्रणासाठी रासायनिक उपायांमध्ये इमामेक्टीक बेंझोयट 4 ग्रॅम किंवा किनॉलफॉस 20 मिली, फेम 39.35 हे 3 मिली हे प्रति 10 लिटरमध्ये मिसळून एका कीटकनाशकाची फवारणी त्वरित घेणे आवश्यक असल्याचे डॉ. अरुण गुट्टे यांनी सांगितले.

Leave a Comment