महायुतीची पहिली मंत्रिमंडळाची बैठक 2 जानेवारीला पार पडली. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत 1500 रुपये महिलांच्या खात्यात जुलै महिन्यापासून जमा करण्यात येत आहेत. पहिले दोन हप्ते एकत्र व त्यानंतर उर्वरित दोन हप्ते एकत्र खात्यावर जमा करण्यात आले होते. त्यानंतर आता डिसेंबरपर्यंत सहा हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. ज्या महिलांना अजूनही योजनेचा लाभ घेता आला नाही किंवा त्यांचे अर्ज बाद झाले आहेत, अथवा त्यांच्या कागदपत्रात काहीतरी गडबड असेल तर तुम्ही शोधून काढा. नाहीतर तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याच्या अर्जाची फेर पडताळणी केली जाणार आहे असे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. गुरुवारी झालेल्या नव्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीनंतर फेरपडताळणी होणार असल्याचे संकेत दिले होते. केशरी आणि पिवळे रेशन कार्ड वगळता सर्वच अर्जांची पडताळणी होणार असल्याचे समजते.याशिवाय वर्धा, पालघर, लातूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातून अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
अर्ज का बाद होऊ शकतो ? :
– ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे.
– घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर चारचाकी वाहन असल्यामुळे अर्ज बाद होऊ शकतो.
– शासकीय नोकरी किंव्हा कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
– एका सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही.
– ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करुन दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही.
– ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.
अर्जाची छाननी कशी होणार, कोण ठरणार पात्र, अपात्र ? :
अर्जाची छाननी कशी होणार याविषयी अदिती तटकरेंनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आयकर आणि परिवहन विभागाकडून आम्ही माहिती मागवली आहे. ज्यांच्या उत्पन्नत वाढ झाली असेल अथवा ज्यांचं उत्पन्न जास्त असेल अशा सर्व महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहे. ज्या महिलांना नोकरी आहे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न निकषांमध्ये बसत नाही त्यांचे अर्ज बाद करण्यात येतील. फेरतपासणीसाठी आयकर विभागाकडून आम्ही डेटा मागवला आहे. राज्यात फेरतपासणी सुरू झाली असून याआधी पुणे, लातूरसह अनेक जिल्ह्यांतील अर्ज बाद झाले आहेत.
2100 रुपये मिळणार का ? :
वर दिलेल्या निकषांच्या आधारे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया राबवली जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महिलांनी फसवणूक केली आहे त्यांना पैसे परत द्यावे लागणार आहेत अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक निकालानंतर स्पष्ट केलं आहे.
