Pune Metro : वाघोली, लोणीकाळभोरसह ‘या’ 7 मार्गांवर धावणार मेट्रो ! पहा असा आहे, पुणे मेट्रोचा नवा रूट मॅप..

पहिल्या टप्प्यातील यशस्वी ऑपरेशननंतर आता पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकासाचा आणि विस्ताराचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते, त्यानंतर पुण्यात दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या संख्येने प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत.

पुणे शहराचा विकास होणार :-

पुण्यात दररोज लाखो लोक ऑफिसला जाण्यासाठी, कुठेतरी बाहेर जाण्यासाठी मेट्रोचा वापर करण्यास प्राधान्य देतात. नुकतेच महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल आणि केंद्र सरकारकडून प्रलंबित मार्गांना मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याशी प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी आणि सेवांमध्ये आणखी सुधारणा करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. यानंतर पाटील यांनी जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन ते मंडई मेट्रो स्टेशन असा मेट्रोने प्रवासही केला आहे.

महामेट्रो (पुणे मेट्रो) च्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 7 मार्गांवर मेट्रोचा विस्तार करण्याची योजना राबवली आहे, त्यापैकी 4 मार्ग असे आहेत की ज्यांना अद्याप केंद्र सरकारची मान्यता मिळालेली नाही. तर पुणे महापालिकेची परवानगी घेणे बाकी असलेले दोनच मार्ग आहेत.

केंद्र सरकारचे मंजुरी राहिलेले चार मार्ग कोणते ?

वनाज ते चांदणी चौक – 1.2 किमी – 2 स्थानके
रामवाडी ते वाघोली / विठ्ठलवाडी – तब्बल11.63 किमी – 11 स्थानके
खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी – 25.66 किमी – 22 स्थानके
SNDT – वारजे – माणिकबाग – 6.12 किमी – 6 स्थानके

PMC च्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेले मार्ग :-

हडपसर ते लोणी काळभोर – 11.35 किलोमीटर – तब्बल 10 स्थानके
हडपसर ते सासवड – 5.57 किमी – 4 स्थानके

पुणे मेट्रोचा भविष्यातील रूट मॅप पहा..
👇🏻
Pune Metro Route Map

याशिवाय निगडी – मुकाई चौक – वाकड – नाशिक फाटा – चाकण या मार्गावर उभारण्यात येणाऱ्या सातव्या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सध्या तयार करण्यात येत आहे. याशिवाय मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट-कात्रज मार्गावरील मेट्रोच्या विस्तारासाठी निविदा काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

तसेच या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी लवकरच कंत्राटदाराची निवड देखील होणार आहे. मात्र आता या नव्या विस्तारामुळे मेट्रो पुण्याच्या शहरी भागात वाहतुकीचे नवे आणि सुलभ साधन म्हणून उदयास येणार नाही तर सर्वसामान्यांनाही मोठ्या प्रमाणात सुविधा देणार असल्याचा दावा केला जात आहे.

Leave a Comment