महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात बळीराजा समृद्ध मार्ग योजना सुरू करण्यात आली आहे. जवळपास 5 हजार किलोमीटरचे पांदणरस्ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहे.
ब्रह्मपुरीत 600 किलोमीटर रस्ते या योजनेतून पूर्णत्वास जाणार असून, महसूल, पंचायत समिती, भूमिअभिलेख, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून या कामांना गती मिळत आहे. दरम्यान तालुक्यात नव्यान प्रस्तावित 247 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे.
बळीराजा समृद्धी मार्ग ही योजना चंद्रपूर जिल्ह्यात राबविली जात असून, शेतकऱ्यांनी पिकविलेला माल घरापर्यंत व पर्यायाने मार्केटपर्यंत पोहोचविणे सुकर व्हावे त्यांना शेतात जाण्या – येण्यासाठी अडचण होऊ नये, या उद्देशाने ही योजना राबविली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 5 हजार किमी पांदनरस्ते तयार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून ब्रह्मपुरी तालुक्याला 600 किलोमीटर पांदन रस्त्याचे उद्दिष्ट्ये प्राप्त झाले आहे. या कामांमध्ये मातीकाम पूर्ण झालेले रस्ते, मातीकाम सुरू असलेले पांदण रस्ते व प्रस्तावित नवीन रस्ते, अशी विभागणी करण्यात आली असून, तालुक्यात 394 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे.
या योजनेच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार, पं. स. स्तरावरील अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक ग्रामरोजगारसेवक व इतर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची सभा घेण्यात आली. ब्रह्मपुरी तालुक्यात नवीन प्रस्तावित 247 रस्त्यांची कामे घेण्यात आली असून नकाशावर नसलेले पांदणरस्ते नकाशावर घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
अतिक्रमण असलेल्या शेत पांदणरस्त्यांना अतिक्रमणमुक्त करण्याची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. शासनाचे पाचही विभाग या योजनेच्या अंमलबजाणीसाठी समन्वय साधून काम करीत असून, तालुक्यात पांदण रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन शेतकऱ्यांसाठी मजबूत रस्ते तयार होणार आहे सामान्य नागरिकांनाही या रस्त्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे ज्यांचे पांदण रस्त्यावर अतिक्रमीत आहे त्यांना स्वतः काढून घेण्याचे आवाहन ब्रह्मपुरीच्या तहसीलदारांनी केले आहे.
