भारतात मालमत्तेच्या व्यवहारासाठी अनेक कायदे असून, वंशपरंपरागत म्हणजेच पूर्वजांकडून मिळालेल्या मालमत्तेच्या विक्रीसाठीही विशिष्ट नियम आहेत. या नियमांची माहिती नसल्याने अनेक वेळा कुटुंबांमध्ये मतभेद आणि कायदेशीर वाद उद्भवतात. त्यामुळे या प्रकारच्या संपत्तीच्या व्यवहारासाठी कोणत्या अटींचे पालन करणे गरजेचे आहे, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
विक्री अधिकार कोणाला ?
वंशपरंपरागत मालमत्ता ही एकट्या व्यक्तीची नसते. त्यावर सर्व वारसदारांचा समान हक्क असतो. त्यामुळे कोणताही एक वारसदार ही मालमत्ता एकट्याने विकू शकत नाही. विक्रीसाठी सर्व भागधारकांची म्हणजे मुलगा, मुलगी व इतर वारसदार यांची लेखी संमती घेणे आवश्यक आहे. जर कुटुंबातील काही सदस्यांनी विक्रीस नकार दिला, तर ती मालमत्ता कायदेशीर मार्गाने विक्रीस पात्र ठरत नाही. अशा मालमत्तेची संमतीशिवाय झालेल्या विक्रीस न्यायालयात आव्हान दिल्यास ती विक्री रद्द केली जाऊ शकते.
कायदेतज्ज्ञांचा सल्ला आवश्यक..
वंशपरंपरागत मालमत्तेच्या व्यवहारात कायद्याचे बारकावे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे कोणतीही कृती करण्याआधी योग्य कायदेशीर सल्ला घेणे गरजेचे आहे. • कायद्याची अचूक माहिती नसेल, तर मालमत्तेचा व्यवहार अडकण्याची शक्यता असते आणि आर्थिक तसेच कौटुंबिक नुकसान होऊ शकते.
कायदेशीर परिणाम काय ?
संमतीशिवाय मालमत्ता विकल्यास अन्य वारसदार न्यायालयात तक्रार दाखल करू शकतात.
न्यायालयाकडून तात्पुरती किंवा कायमस्वरूपी बंदी लागू होऊ शकते.
विनापरवानगी झालेली विक्री रद्द करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते.
विकलेली मालमत्ता परत मिळवण्याचा इतर वारसदारांना कायदेशीर हक्क प्राप्त होतो.
वंशपरंपरागत मालमत्ता म्हणजे काय ?
भारतात संपत्तीचे दोन प्रमुख प्रकार आहेत जसे की, व्यक्तिगत मालमत्ता जी एखाद्या व्यक्तीने स्वतः च्या उत्पन्नातून खरेदी केलेली असते, किंवा भेट, दान, वारसाने किंवा हस्तांतरणाद्वारे मिळालेली असते.
वंशपरंपरागत मालमत्ता ही पूर्वजांकडून पुढील पिढ्यांना मिळणारी संपत्ती आहे. या मालमत्तेवर कुटुंबातील चार पिढ्यांपर्यंत समान हक्क असतो. उदा. आजोबांकडून मिळालेली जमीन किंवा घर.
